पुणे : पुण्यातील दत्तनगर परिसरात पितापुत्राच्या पोटात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन गोंधळ घालणार्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार्या ज्येष्ठाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी तरुण वडिलांना घेऊन गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो, असं म्हणत पितापुत्रांच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना दत्तनगरमधील टेल्को कॉलनीत रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत नवनाथ आनंदा कुलथे (वय ४६, रा. दत्तनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संग्राम धुळुबा शिंदे (वय ४८, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याला अटक केली आहे. याबाबत गौरव नवनाथ कुलथे (वय २४, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. संग्राम हा दोन महिन्यांपूर्वी गल्लीत दारु पिऊन गोंधळ घालत होता. तेव्हा फिर्यादीचे वडिल नवनाथ कुलथे यांनी त्याला रागावून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच राग मनात धरुन संग्राम याने रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांना शिवीगाळ केली होती. हे मुलगा गौरव याला समजल्यावर रात्री तो वडिलांना घेऊन जाब विचारण्यासाठी संग्राम याच्याकडे गेला होता.
त्यावेळी संग्राम याने तुला आत्ताच संपवून टाकतो, असं म्हणत त्याने फिर्यादीच्या वडिलांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्यांना वाचविण्यासाठी गौरव पुढे गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो, असं म्हणत त्यांच्याही पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेत दोघही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.