पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांनी डाव उधळला आहे. पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या पाच चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून कोयते, मिरची पावडर सह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 30 मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील किनारा हॉटेल समोरील पेट्रोल पंपाच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
ओंकार उर्फ बाब्या संतोष पवार (२१, रा. मानाजीनगर, नऱ्हे), रोहित काशीनाथ धोंगडे उर्फ डी (२१, रा. महालिला निवास, कात्रज), रोहन विठ्ठल रणदिवे (१९, रा. त्रिमूर्ती हाईट्स, गुजरवाडी, कात्रज) आणि संकेत संजय हटकर (२०, रा. बालभवन, संतोषनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस कर्मचारी विक्रम सावंत यांनी फिर्याद दिली आहे
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तपास पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी किनारा हाॅटेल परिसरातील एका पेट्रोल पंपावर चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून कोयते, मिरची पावडर, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक निरीक्षक विश्वास भाबड यांच्यासह पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड करत आहेत.