Bharat Gaurav Train पुणे : केंद्र शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ‘देखो अपना देश’ या थीमनुसार देशांतर्गत पर्यटनाकरिता भारत गौरव’ रेल्वेसेवा Bharat Gaurav Train सुरू केली. या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशांमध्ये देशातील विविध ठिकाणची पर्यटनस्थळे, धार्मिक तीर्थस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळत आहे.
भारत गौरव रेल्वेसेवा आतापर्यंत मुंबईतूनच सुरू होती. ती सेवा पुण्यातूनसुध्दा सुरू झाली आहे. 28 एप्रिल रोजी पुण्यातील पहिली भारत गौरव ट्रेन धावणार आहे. ही गाडी पुण्यातून गया, कोलकाता, प्रयागराज, पुरी, वाराणसी या ठिकाणांसाठी धावणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या आयआरसीटीसीकडून या सेवेचे नाव पुरी गंगासागर दिव्य काशी यात्रा असे ठेवण्यात आले आहे.
पुण्यातून आणखी गाड्या धावणार…!
पुण्यातून उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात ११ मे रोजी आणखी एक ’भारत गौरव’ ट्रेन सोडण्यात येणार आहे. या गाडीद्वारे पर्यटक प्रवाशांना उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर-आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतेश्वर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी या ठिकाणांना भेट देता येईल, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना आयआरसीटीसी टुरिझम मॅनेजर रविकांत जंगले म्हणाले, “सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ही केंद्र शासनाची ’भारत गौरव’ योजना सुरू आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २८ तारखेला पुण्यातून ’भारत गौरव’ सेवेची पहिली गाडी सुटणार आहे.
”
रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या…!
“मुंबईपूर्वी रेल्वेची भारत दर्शन योजना होती. ती बंद करून भारत गौरव नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सर्वसामान्यांना परवडणारी आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, ’भारत गौरव’ ही योजना महागडी आहे. भारत दर्शन या योजनेपेक्षा भारत गौरव योजनेतील तिकीट दर जादा आहेत. ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.”