पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्टॉपवर भरगर्दीत तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्यानंतर पाठलाग करुन भर रस्त्यात तरुणीचा हात पकडून लग्नाची मागणी करणार्या प्रियकराला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अभिजित श्रावण गायकवाड (वय-२९, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी येरवडा येथील एका २२ वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अभिजित या दोघांमध्ये तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. काही कारणाने फिर्यादी यांनी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. फिर्यादी या सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्टोप समोरील रोडवर आल्या असताना अभिजित याने त्यांना भर रस्त्यात अडविले.
त्यानंतर तिचा हात पकडून तू माझ्या सोबत लग्न कशी करत नाही, तेच बघतो, असं म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्या केले. तसेच फिर्यादी व तिच्या घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करीत आहेत.