यवत : खोर गावातील माळरानात हजारो ब्रास अनधिकृत मुरूम उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याबाबतच्या तक्रारी दौंड तालुक्याचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी तात्काळ महसूलचे विशेष पथक तयार केले. याप्रकरणाची अधिक चौकशी केली असता भांडगाव ग्रामपंचायत सदस्यच अनधिकृत मुरूम उत्खनन करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
महसूल विभागाने तयार केलेल्या पथकात तलाठी सोमशंकर बनसोडे, दुशांत पाटील, सचिन जगताप, पुंडलिक केंद्रे या पथकाने खोर येथील अनधिकृत मुरूम व माती उत्खननावर कारवाई केली असून, खोर येथील जमीन गट. नं. ३० मध्ये दौंड महसूलच्या पथकाने पंचनामा करण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून हजारो ब्रास मुरूम व माती उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असून, लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. दौंड महसूल विभाग निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असताना या कारवाईने दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील माती, मुरूम माफियांनी भलतीच धास्ती घेतली आहे.
भांडगाव येथील प्रमोद दोरगे ग्रामपंचायत सदस्य असताना देखील अनधिकृत मुरूम उत्खनन करत असून, एका स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी असताना पदाचा गैरवापर करणे अतिशय निंदनीय आहे. प्रमोद दोरगे हे ग्रामपंचायत सदस्य असल्याने शासकीय कर्मचारी यांच्यावर दबाव टाकत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे काळे धंदे करायचे आणि दुसरीकडे राजकीय वजन वापरून सर्वसामान्यांना वेठीस धरायचे अशी कामे प्रमोद दोरगे करत असल्याची देखील चर्चा आहेत.
दरम्यान, अनधिकृत मुरूम उत्खनन सुरू असल्याचे तक्रार प्राप्त झाल्याने विशेष पथक पाठवून पंचनामा केला असून, नोटीस पाठवून खुलासा मागवणार असल्याचे तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले.