पुणे : भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणा-या व वारीचे वार्तांकन करणा-या पत्रकाराला दरवर्षी “भागवत धर्म प्रचारक” पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सकाळचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रकृष्ण कापसे यांना देण्यात आला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील संत मुक्ताई मठात त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, अमोल पाटील, पंकज पाटील, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार शरद ढमाले, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, छायाचित्रकार राघव पसरिचा, इटली येथील छायाचित्रकार ईवा, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय जोरकर, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील म्हणाले, संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातील अनेक दिंड्या या सोहळ्यात चालतात. पुढील काळात महिला वारकरी दिंड्यांना या सोहळ्यात प्राधान्य दिले जाईल.
सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज म्हणाले कि, पत्रकारांनी वारीच्या माध्यमातुन सकारात्मक वारी समाजामध्ये पोहोचविण्याचे काम केले आहे. वारीचे वाढते रुप हे प्रसार माध्यमाची देण आहे. आज पालखी सोहळ्यात ज्या सोयी सुविधा शासन उपलब्ध करुन देत त्यामध्ये प्रसार माध्यमांचा मोठा वाटा आहे.
यावेळी पत्रकार राजेंद्रकृष्ण कापसे म्हणाले, आई वडिलांच्या संस्कारामुळे माळकरी झालो. पत्रकारिता करताना वारकरी झालो. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मागील १३ वर्षापासून वार्तांकन केले आहे. त्याचे फळ म्हणजे हा पुरस्कार आहे. दरम्यान, छायाचित्रकार राघव पसरिचा, इटली येथील छायाचित्रकार ईवा यांचा ही विशेष सत्कार मुक्ताई संस्थानच्या वतीने करण्यात आला.