लोणी काळभोर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सध्या त्यांच्या हद्दीतील उभारलेले अनधिकृत जाहिरात फलक अथवा होर्डिंग काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी. असे आदेश राज्याच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी नव्या आदेशानुसार दिले आहेत. मात्र पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान तब्बल 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. हे होर्डिंग ग्रामपंचायत प्रशासनाला काढण्यास शक्य होईल का? तेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामपंचायतींना होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचे, तसेच ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसतानाही ग्रामपंचायतींनी परस्पर होर्डिंग उभारण्यासाठी जागा मालकांना परवानगी दिल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतींना अशी परवानगी देण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या प्रकारची परवानगी, तसेच ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे नियमबाह्य कृत्य करू नये. असे नियमबाह्य कृत्य केल्यास संबंधित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल? असे सहसचिव वर्षा भरोसे यांनी आदेशात म्हटले आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर, 15 नंबर, मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील एललाईट चौक व तळवडी चौकात 200 हून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. हे सर्व होर्डिंग लोकवस्तीत असून जागा मालक व चालकाने धोकादायकरीत्या उभारले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान असलेल्या अनधिकृत होर्डिंग मालक व चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अनधिकृत होर्डिंगवरील फ्लेक्स काढले आहेत. मात्र काही ठिकाणी लोखंडाचा सांगाडा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, शासनाने जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी होर्डिंग्जसंदर्भात नियमन व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना व नियम केले आहेत. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज लावण्यासाठी उभारण्यासाठी मान्यता देण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959, तसेच त्याअंतर्गत तयार केलेले नियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 मध्ये कोणतीही तरतुद नाही.
अनधिकृत होर्डिंग काढण्यास शक्य होईल का?
पूर्व हवेलीतील होर्डिंग च्या खाली अनेक टपऱ्या, दुकाने, हॉटेल, हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर आले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचे फावले आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग काढण्यास शक्य होईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
लोणी काळभोर येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले होते. प्रशासनाने कोणतेही ठोस कारवाई न केल्याने पुन्हा नव्या जोमात धोकादायकरीत्या होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? तसेच होर्डिंगचा जागा मालक व चालकांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.