विशाल कदम
लोणी काळभोर : तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागण्यासाठी वाहनचालकांकडे जातात. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास जबरदस्ती केली जाते. हा प्रकार पुणे शहरासह जिल्ह्यातही सर्रासपणे पाहिला मिळतो. त्यामुळे पुण्याचे अमितेश कुमार यांनी तृतीयपंथीयांना सिग्नलवर पैसे मागण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान रस्त्यावर थांबून वाहनचालकांशी हुज्जत घालून तृतीयपंथी पैसे उकळत आहेत. त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर, मांजरी फार्म, कवडीपाट टोलनाका, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा व उरुळी कांचन परिसर हे तृतीयपंथीयांच्या लुटण्याच्या अड्ड्यांचे ठिकाण बनले आहे. सायंकाळी अंधार पडल्यानंतर मांजरी फार्म, कवडीपाट टोलनाका व माळीमळा येथे तर त्यांनी खुलेआम गोरखधंदा सुरु केला आहे.
कवडीपाट येथील जुन्या टोल बूथजवळ गतिरोधक असल्याने त्याठिकाणी चारचाकी वाहने हळू होत असतात. वाहने हळू झाल्याने बोगस तृतीयपंथी गाडीच्या काचेवर हाताने जोरजोरात मारतात व दमदाटी करुन पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास वाहनचालकांना शिवीगाळ व कथित शापाची लाखोली वाहिली जात असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्यांच्या या कृत्याला अनेकजण त्रस्त आहेत. या तृतीयपंथीयांच्या हावभावाने व वागणूकीने वाहनचालक व वाहनांमधील कुटुंबीय यांची कुंचबणा होत असते.
लोणी काळभोर येथील माळी मळा हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर, तृतीयपंथी सायंकाळी सात वाजल्यानंतर खुलेआमपणाने रस्त्याच्या साईडला थांबून ‘साईड बिझनेस’ करत आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी चालकांना हात दाखवून ना-ना प्रकारचे इशारे केले जात आहेत. त्यामुळे या ‘साईड बिझनेस’ची व्याप्ती लोणी काळभोर परिसरात वाढू लागली आहे.
काही भामटे करतात तृतीयपंथीयांची वेशभूषा
पुणे शहरासह ग्रामीण भागात तृतीयपंथीयांची मोठी वस्ती आहे. त्यामुळे येथे काही भामटे तृतीयपंथीयांची वेशभूषा परिधान करून आपला गोरखधंदा थाटला आहे. परिणामी, खरे आणि खोटे तृतीयपंथी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बिना मेहनतीचा अमाप पैसा येत असल्याने टाळी वाजवून खुशाली मागणाऱ्यांमध्ये आता बनावट तृतीयपंथीयांच्या टोळ्यांचा शिरकाव वाढला आहे.
पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता.१०) आदेश काढून तृतीयपंथीयांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. शहरात यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. तसेच घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावता येणार नाही. तृतीयपंथींनी या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, आता या आदेशाची हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यानही अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांची मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’
हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान बोगस तृतीयपंथींकडून वाहनचालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहनात कुटुंब किंवा एखादी महिला बसलेली असल्यास तृतीयपंथीच्या वागण्यामुळे मोठी लज्जास्पद परिस्थिती निर्माण होते. मात्र, पुणे महापालिकेसह हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवल्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. या भूमिकेमुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे. त्यामुळे या तृतीयपंथीयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.