बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यात असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय उभारले जाणार नाही. आयटी पार्क व लॉजिस्टिक पार्कसाठी अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. पालखी तळावर दिलेला शब्द हा पाळला आहे. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. काँग्रेस वाले न्यायालयात गेले. एका न्यायालयाने त्यांना थापडले. आता पुन्हा नागपूर न्यायालयात गेले आहेत. पण, ही योजना बंद होऊ देणार नाही. उलट रक्कम वाढविणार असून लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सासवड( ता. पुरंदर) येथील मोठ्या पालखीतळ मैदानावर महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे वीजबील माफ, तसेच शेतीपूरक कर्ज, सातबारा कोरा करण्यात येणार आहे. तर आत्ता आमच्या भाऊजींना धनुष्याला मत देण्याची गळ घालायची आहे. मी स्वतःला मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन समजतो, मला कॉमन मॅन सुपरमॅन बनवायचे आहेत. सरकारमधून पाय उतार व्हायला धाडस आणि मोठे मन लागते. त्या अडचणीच्या काळात शिवतारे बापू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, म्हणून मी भक्कमपणे पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी उभा राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या सभेवेळी वासुदेव काळे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, रुपेश कोंडे ,संदीप हरपळे, पंडितराव मोडक, दिलीप आबा यादव, डॉ. ममता शिवतारे, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, हरिभाऊ लोले, रमेश इगले, निलेश जगताप, सचिन भोंगळे ,अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी ,अतुल मस्के, आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केले जाईल. अडीच हजार कोटीची आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कसाठी तरतूद केली आहे. याच पालखी मैदानावर दिलेला शब्द मी पाळला आहे. तसेच या वर्षी पुरंदर हवेलीमध्ये विजयाची गुढी उभारणार हे नक्की असेही मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले.