पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पायी घरी जाणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सागर पाटील आणि सौरभ कोंडके आणि इतर दोन अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणी रात्री एक वाजता खराडी परिसरातून कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी या परिसरातील काही तरुण रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसले होते. तरुणी एकटी जात असताना या तरुणांनी तरुणी जवळ जाऊन तुला बोलायचं आहे, असं म्हणाले. हे पाहून तरुणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणांनी काही वेळ तरुणीचा पाठलाग करून तिला बोलण्याचा प्रयत्न केला.
तरुणीनी घाबरून तिच्या मित्रांना कॉल केला. त्यावेळी मित्राने या तरुणांकडे जाब विचारला असता या तरुणांनी तरुणीच्या २ मित्रांना लाकडाच्या दांडक्याने जबर मारहाण केली. एका मित्राच्या मानेवर तर दुसऱ्या मित्राच्या हातावर खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. रुपेश हुंडारे आणि सिद्धांत सिंग असं तरुणीच्या जखमी झालेल्या मित्रांची नावं आहेत.