पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. स्लॅबमधून पाणी गळत असल्याच्या कारणावरून दोघांनी एका युवकाला आणि त्याच्या आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना हडपसर परिसरातील पारीजात कॉलनीत 3 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे.
याबाबत स्वप्नील ज्ञानेश्वर मोरे (वय-39 रा. पारिजात अपार्टमेंट, आकाशवानी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार दिलीप साळुंके (वय-33), केदार दिलीप साळुंके (वय-33 रा. पारीजात कॉलनी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. स्लॅबमधून पाणी गळत असल्याच्या कारणावरुन आरोपी फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच वीटेने जबर मारहाण करुन जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी, आई-वडील मध्ये आले असता त्यांनाही मारहाण केली.
या घटनेनंतर फिर्यादी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना आरोपी केदार साळुंके याने गाडीची चावी काढून घेतली. यावेळी फिर्य़ादी यांच्या वडिलांनी मध्यस्थी केल्याने आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच पत्नीच्या अंगावर धावून गेला. तुझ्या पोराला मी जीवंत सोडणार नाही. त्याची मारण्याची सुपारी देतो अशी धमकी आरोपीने फिर्य़ादी यांच्या आईला दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.