युनूस तांबोळी
पुणे : सध्याचे राजकर्ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. भाजपकडून तुरूंगात टाकण्याबाबत धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे तुरूंगापेक्षा भाजप बरा, अशी भूमिका माझ्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी घेतली. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा होती. निष्ठा बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत मतदार देखील निष्ठा ठेवणार नाहीत. राज्यात मराठी माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निष्ठावान लोकप्रतिनीधींच्या बाजूने मतदार कौल देतील, असा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुधवारी (ता. २१ ) झालेल्या जाहिर सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, अशोक पवार, सुनील भुसारा, प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हाध्यक्ष जग्गनाथ शेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, सत्यशिल शेरकर, महेबूब शेख, अरुणा घोडे, दामूआण्णा घोडे, सुरेश भोर, बाळासाहेब बाणखिले, भारती शेवाळे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, दहा वर्षे कृषीमंत्री पद भुषवून शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यातून अन्नधान्याची भरभराट झाली. सध्या देशात सर्वसामान्यांच्या हितापेक्षा मोदीची गॅरंटीची जाहिरात मोठी आहे. अदिवासीबाबत मोदींना आस्था नाही. शेतकरी अडचणीत असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. अनिल देशमुख, संजय राऊत यांना तरूंगात टाकले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. कारवाईच्या भितीपोटी ते भाजपामध्ये गेले.
जयंत पाटील म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारखा हुशार लोकप्रतिनीधी तुम्ही निवडून दिला, त्यामुळे संसदेत तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणारा संसदरत्न खासदार म्हणून त्यांचा नावलौकीक झाला. डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष व चिन्ह हिसकावून नेण्याचे काम केले. आम्ही जर खोलात गेलो तर तुमचे ४० आमदार अपात्र होतील, याची नोंद घ्या. पवार साहेब वस्ताद असून, त्यांनी टाकलेला एकच डाव सर्वांना चितपट करणारा ठरेल. शरद पवार हाच पक्ष जे चिन्ह मिळेल ते घराघरापर्यंत पोहचवा. बुथ कमिट्या स्थापन करा.
रोहित पवार म्हणाले की, भाजपचे सरकार असताना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, बबनराव पाचपुते व दिलिप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हुतात्मा बाबू गेनू जलाशयाला बोगदा पाडून माणिकडोहला पाणी नेण्याविषयी वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यावेळी पवार साहेब म्हणाले की, आंबेगावच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. त्यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.
लाव रे तो व्हिडीओ…
जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली. त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला उपस्थितांनी टाळ्या वाजवून भरभरून साथ दिली.
बेट भागातून रॅली
शिरूरच्या बेट भागातून माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे व माजी सरपंच दामुआण्णा घोडे यांनी गावागावातून गाड्यांची रॅली काढली होती. मंचरमध्ये ही रॅली आल्यावर सभेचे खास आकर्षण ठरली.