लोणी काळभोर : हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात बीसीएसचा शेवटचा पेपर देण्यास दुचाकीवरून चाललेल्या विद्यार्थ्याचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौकाजवळ मंगळवारी (ता.२१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी होऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे थेऊरसह परिसरात दुख:चे वातावरण पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिक बाळासाहेब यादव (वय – २१, रा. थेऊर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब यादव हे एक पीएमटी बस चालक आहेत. तर त्यांचा मुलगा प्रतिक यादव हा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात बीसीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. द्वितीय वर्षाचे सगळे पेपर झाले होते. मात्र, शेवटचा पेपर आज मंगळवारी होता व उद्यापासून सुट्टी लागणार होती.
दरम्यान, मंगळवारी राहिलेला शेवटचा पेपर देण्यासाठी प्रतिक यादव हा दुचाकीवरून चालला होता. दुचाकीवरून जात असताना, त्याची दुचाकी मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौकाजवळ आली असता, टँकर व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये टँकर प्रतिकच्या अंगावरून गेला. या अपघातात प्रतिक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारासापुर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
यादव कुटुंबावर कोसळला दुख:चा डोंगर
बाळासाहेब यादव हे पीएमटी बस चालक असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. तर मुलगा प्रतिक हा बीसीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मात्र, आज मंगळवारी परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी निघालेल्या प्रतिकचा अपघात झाला. या अपघातात प्रतीकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हुशार व एकुलता एक मुलगा हरपल्याने यादव कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. थेऊरसह परीसारात दुख:चे वातावरण पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.