पुणे : पुण्यातील बार, रूफ टॉप हॉटेल आणि पबसोबतच रेस्टॉरंटही सर्व नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणे मध्यरात्री दीडपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. पोलिसांकडून या रेस्टॉरंटना ११ वाजता बंद करण्यासाठी तगादा लावण्यात येणार नाही, असं पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला इथून पुढे पुण्यात बंदी असणार आहे. तसेच, रेस्टॉरंट, बार, पबसाठी सुधारित नियमावली आणि आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत, असही त्यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात हॉटेल आणि बारचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. १२५ हॉटेलचे मालक, प्रतिनिधी उपस्थित होते. बार, पब दीड वाजेपर्यंत सुरू राहत असले, तरीही रेस्टॉरंट मात्र रात्री ११ वाजता बंद करण्यासाठी पोलिस आग्रही असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंटचालकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
महानगरांची नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते पब, बार आणि रेस्टोरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात. तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांनी बारीक नजर ठेवणंही आवश्यक असतं. अनेकदा पब आणि बार मालकांकडून नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. तर पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यासाठीच पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यवसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली.
अशी असेल नियमावली?
- रूफ टॉप हॉटेलमध्ये साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे.
- रूफ टॉप हॉटेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या हॉटेलला दारू विक्रीचा परवाना नसल्यास कारवाई होणार
- हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्याविरोधात कारवाईसाठी मोहीम राबविणार
- मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा परिसरात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांसह त्यास प्रोत्साहन देणा-यांवर कारवाई करणार,
- मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पबमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको
- अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत.
- नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील.
- दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई