पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे यंदा बारामती मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अर्थात नणंद विरूद्ध भावजय… असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना प्रथमच उमेदवारी मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांचे शिक्षण, आवड आणि सामाजिक कार्य याविषयी जाणून घेऊया…
शिक्षण आणि आवड
सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. वडिलांचे नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील असे आहे. सुनेत्रा पवारांचे बी. कॉम झाले असून, व्यवसाय शेती आहे. चित्रकला, वाचन, शेती, निसर्ग फोटोग्राफी हे त्यांचे छंद असून, समाजकार्यामध्ये त्यांना विशेष रस आहे.
सामाजिक कार्य
सुनेत्रा पवार यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती. अध्यक्षा, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्या विश्वस्तही आता आहेत.
मिळालेले पुरस्कार
सुनेत्रा पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चिंचवड देवस्थान तर्फे ‘श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार २०२१’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे ‘आऊटस्टँडींग वुमन अॅवार्ड’ आणि ‘लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार तर राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ असे पुरस्कार मिळाले आहेत.
शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदान
सुनेत्रा पवार यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिक जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन केले आहे. विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले आहे. विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांना प्रोत्साहन दिले आहे. काटेवाडी गावात २००० पासून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे.