पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात बारामतीच्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या बारामतीच्या तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बिबवेवाडी भागात 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निलसागर सोसायटी जवळ घडली आहे. संग्राम हनुमंत साळुंके (वय 22, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तपास करून महिलेच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बारामतीच्या संग्रामची पुण्यातील धनकवडी येथील आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याबाबत महिलेचा पती आरोपी नितीन रेणुसे याला कुणकुण लागली होती. दरम्यान, संग्राम पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती नितीन रेणुसे याला मिळाली होती.
संग्राम दोन डिसेंबर रोजी बिबवेवाडी येथील किया सर्व्हिस सेंटर येथे आला असता आरोपींनी त्याला गाठले. दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ संग्रामला नेले. त्याठिकाणी त्याला टोळक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संग्राम गंभीर जखमी झाला होता. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या संग्रामला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ करत आहेत.