मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.
त्यामुळे बारामतीमध्ये काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येणार, असा ठाम विश्वास वक्त केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी एक लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला. लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला आणि मी तो स्वीकारला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेळी मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.