पुणे : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. बारामतीसाठी महायुतीच्या उमेदवाराचं नाव जरी जाहीर झालं नसलं, तरी राष्ट्रवादीनं लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, नणंद-भावजयमध्ये होणाऱ्या या निवडणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज यानिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीज साजरी केली जाते. गेली अनेक वर्ष सुप्रिया सुळे तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावतात. यावर्षी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीजेसाठी भाविक एकत्र येत असतात. याचंच औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आज (बुधवारी) सकाळी सव्वाअकरा वाजता सुनेत्रा पवार तर अकरा वाजता सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, असं त्यांच्या नियोजित दौऱ्यात वेळ ठेवण्यात आली आहे. याआधी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीतील जळोची येथे एका मंदिरात समोरासमोर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी एकमेकांनी मिठी मारली होती. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.