बारामती : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल जाहिर झाला आहे. बारामतीचा देशातील अठरावे स्वच्छ शहर म्हणून पहिल्या २० शहरांच्या यादीत प्रथमच समावेश झाला आहे. लोकसंख्यानिहाय विचार करता, एक ते तीन लाखांदरम्यानच्या पहिल्या २० शहरांत बारामती देशातील एकमेव शहर ठरले आहे. विशेष म्हणजे बारामतीने या स्पर्धेमध्ये ७९६८ गुण प्राप्त केले. भारतातील पहिल्या २० स्वच्छ शहरांमध्ये बारामतीचा समावेश झाल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून बारामतीकरांनी स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले. बारामती नगरपालिकेने यात महत्वाची भूमिका बजावली. मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक शहर स्वच्छतेसाठी अनेक पावले उचलली व त्याचा परिणाम म्हणून बारामती देशातील पहिल्या २० स्वच्छ शहरांमध्ये आले आहे. गतवर्षी एक ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला होता. यंदा मात्र केंद्र सरकारने एक लाख व त्याहून अधिक सर्वच शहरांना एकाच श्रेणीत आणले आहे. यात एक लाखांपासून ते एक कोटी लोकसंख्येपर्यंतची सर्वच शहरे समाविष्ट झाली.
गतवर्षी बारामती शहर नवव्या स्थानावर होते; यंदा ते तिसऱ्या स्थानावर आले आहे. लोकसंख्येचा विचार करता एक लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात बारामती देशात प्रथम क्रमांकावरच आहे. बारामतीच्या पुढे असलेल्या सर्व १७ शहरांची लोकसंख्या बारामतीहून अधिक आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक अनेक प्रकल्प राबविले. शहर स्वच्छ व सुंदर कसे राहिल, याची काळजी घेतली. त्याचा परिणाम म्हणून बारामती देशातील पहिल्या २० स्वच्छ शहरांत समाविष्ट झाले आहे.