बारामती : बारामती शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे २ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एप्रिल २०१० ते मार्च २०२२ या कालावधीत अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून संस्था व ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष यांच्यासह टीम जणांनवर बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अनिल बबनराव गलांडे (रा. शांभवी, अशोकनगर, बारामती), तत्कालीन सचिव मुकुंद महादेव गिजरे (मु.पो. सातव गल्ली, कसबा, बारामती), श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकुळवाडी, कचेरी रोड बारामती), यांच्याविरुध्द बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशेष लेखापरीक्षक सुनील मथुरा काळे (रा. वडगाव, ता. करमाळा, सोलापूर) यांनी फिर्याद नोंदविली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकंभरी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अनिल गलांडे, सचिव मुकुंद गिजरे व मंजुश्री दुगम यांनी एप्रिल २०१० ते मार्च २०२२ या कालावधीत पदाचा गैरवापर करत कर्जव्यवहारात गैरव्यवहार करून २ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केला.
तसेच खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार करून, कर्ज खतावणीत चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा नियमांचे उल्लंघन करत विनातारण कर्ज देत, अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून संस्था व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय अधिकाराचा गैरवापर आणि पदाचा दुरुपयोग करून, संस्था व सभासदांचा विश्वासघात करून अपहार केल्याचे नमूद केले आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.