डोर्लेवाडी, ता. 25: बारामती शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत नितीन वाईन शॉप, साठेनगर यास दोन आठवड्यांसाठी सील करण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1449 चे कलम 142 (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन वाईन शॉप समोर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या घटनेत वाईन शॉपचे व्यवस्थापक आणि कर्मचारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात सहभागी असलेला अक्षय काकडे उर्फ बागवान हा रेकॉर्डवरील गुंड असून, यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते.
घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी नितीन वाईन शॉपच्या मालक व व्यवस्थापकांना हल्लेखोरांविरोधात फिर्याद देण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिला. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळत असल्याचा संदेश समाजात जात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदर वाईन शॉप समोर जमाव जमवुन पुन्हा दंगा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दारूबंदी कायद्यानुसार नितीन वाईन शॉप दोन आठवड्यांसाठी बंद करण्याचा आदेश दिला. बारामती शहरात अशा प्रकारची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इतर व्यावसायिकांना संदेश देण्यात आला आहे की, कोणत्याही गुन्हेगारांविरुद्ध भीती बाळगू नये. गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, अन्यथा संबंधित आस्थापनांवरही कठोर कारवाई केली जाईल.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांनी विशेष मोहीम राबवली.
दरम्यान, बारामती पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांकडून शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कठोर उपाययोजना सुरूच राहतील.