Baramati News बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला आहे. (Baramati News)
राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी हा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने हा निर्णय घेतला आहे. बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयात पाचशे विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय व पाचशे खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय सुरु झाले आहे. या महाविद्यालयाचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे नामकरण करण्यात आले असून त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहे.
या महाविद्यालयाची ओपीडी सुरु झाली असून दैनंदिन पाचशेहून अधिक रुग्ण याचा लाभ घेत आहेत. या महाविद्यालयातील सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन हे विभाग सुरु झाले असून शस्त्रक्रिया करण्यासाठी लवकरच सीएसएसडी प्रणालीचेही काम पूर्णत्वास जाणार आहे. या महाविद्यालयात सुसज्ज अशी अकरा ऑपरेशन थिएटर्स असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज शासकीय रुग्णालय असा याचा नावलौकीक आहे.