पुणे : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यात रोज नव्या घडामोडी घडतआहेत. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवार गटाच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे. वीरधवल जगदाळे यांनी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वीरधवल जगदाळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. त्यांच्यासाठी बारामती चांगले वातावरण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.
पत्रात काय लिहिलंय?
पुढील काही काळातच लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मी माझे मत मांडू इच्छितो. आपण सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( शिंदे गट) यांच्याबरोबर सत्तेमध्ये एकत्रित आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपल्या हक्काचा आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी भरगच्च असलेला मतदारसंघ आहे. अजितदादांनी देखील यापूर्वी काही काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह, अजितदादा पवार व कुटुंबाप्रती असलेले प्रेम, जनसामान्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा असलेला दांडगा संपर्क यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय सोयीस्कर राहणार आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की या मतदारसंघाची उमेदवारी सुनेत्रावहिनी यांना मिळावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
आपण सध्या राज्यात आणि केंद्रात देखील सत्तेत आहोत या गोष्टीचा फायदा या भागातील विकासासाठी होणार आहे. तरी आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने आपणास नम्र विनंती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावाचा आपण प्रामुख्याने विचार करावा, अशी विनंतीदेखील त्यांनी या पात्रातून केली आहे.