छत्रपती संभाजीनगर : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, याबाबत महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे,’ असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. यामुळे बारामतीचा महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवारच आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
लोणावळ्यात “रन फॉर नेशन, रन फॉर मोदी” मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला, यावेळी वाघ बोलत होत्या. महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. यादरम्यान, बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजया असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याने राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात याची चर्चा होत आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या या दोन्ही उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या सोशल मीडियावर स्टेट्सवरून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून आपली तुतारी निशाणी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्टेट्स ठेवण्यात येत आहेत.