बारामती : बारामती मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी मिळेल, याची घोषणा आठवडाभरात राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करतील, असे प्रतिपादन युगेंद्र पवार यांनी केले. बारामती विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) गटाचे उमेदवार युगेंद्र पवार असतील, अशी चर्चा आहे. मात्र, इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार न आल्याने, शहरात चर्चांना उधाण आले होते. राज्याच्या राजकारणात बारामतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धर्तीवर आता राष्ट्रवादी पार्टीचे संभाव्य उमेदवार लवकरच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार घोषित करतील, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल, असे सांगितल्यावर बारामती मतदारसंघात अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, मागील काळात युगेंद्र पवार यांनी तालुक्याचे दौरे करीत लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असून, युगेंद्र पवार यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांचे समर्थक करीत असून बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.