भिगवण : बारामती-भिगवण शटल भिगवण बस स्थानकापासून सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गाडीचे पूजन करून स्वागत केले.
बारामती-भिगवण शटल भिगवण बस स्थानकापर्यंत येत नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. शटल बस स्थानकापर्यंत येण्यासाठी भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांनी बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते.
भिगवणवरून बारामतीला प्रवास करणाऱ्यांमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच नोकरदार वर्ग, महिला यांचीही संख्या जास्त आहे. परंतु बारामती-भिगवण शटल भिगवणमध्ये बस स्थानकापर्यंत येत नसल्याने येथील प्रवाशांना मदनवाडी-चौफुला किंवा तक्रारवाडी येथे सुमारे एक ते दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत विद्यार्थी, नागरिक, महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही गैरसोय दूर करण्यासाठी निवेदन देण्यात होते. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे अखेर भिगवण बस स्थानकापासून बारामती भिगवण शटल सेवा सुरू करण्यात आली आहे.
भिगवण ग्रामपंचायतीने दिलेले निवेदन तसेच तेथील प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेऊन बारामती-भिगवण शटल भिगवण बस स्थानकावरून सुरू करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक वृषाली तांबे यांनी सांगितले. या वेळी पराग जाधव, प्रा. तुषार क्षीरसागर, जावेद शेख, गुरप्पा पवार, दत्ता धवडे, आप्पासाहेब गायकवाड, नियंत्रक राऊत, सत्यवान भोसले, बाळासाहेब जगताप, बस चालक राजेंद्र गवंड, विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सततच्या पाठपुराव्याला यश
बारामती-भिगवण शटल भिगवणमध्ये येत नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन तसेच गैरसोय दूर करण्यासाठी याबाबत निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने मागणीला यश आले व शटल सेवा सुरू झाली.
– प्रा. तुषार क्षीरसागर, माजी ग्रामपंचायत सदस्य, भिगवण