पुणे : बारामती मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात अखेर अजित पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पराभूत केलं आहे. अजित पवार यांना 73 हजार 025 मतं मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना 34 हजार 773 मतं मिळाली आहे. अजित पवार यांनी तब्बल 38 हजार 252 मतांनी आघाडी मिळवली आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरविले गेले. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु बारामतीकरांची पसंती अजित पवार यांना राहिली आहे.
बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. पक्षांतर व पक्षफुटीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची बनली होती. बारामतीच्या निकालाकडे फक्त राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले होते. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपला विजय कायम ठेवला आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांना आपला विजय कायम ठेवण्यास यश आले आहे.