पुणे : उन्हाचा तडाखा सुरू होताच राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम संपत आला असून, पुढील काही दिवसात साखर कारखान्यांचे पट्टे पडतील. राज्यात १०५ हून अधिक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले असून, यंदा ऊस गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर सर्वात जास्त ऊस गाळपात शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने बाजी मारली आहे.
राज्यात २०७ साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप हंगाम घेतला. आतापर्यंत १० कोटी २३ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, १० कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ५९ लाख टन झाले असून, कोल्हापूरचे एक कोटी ४८ लाख टन झाले आहे. पुणे व अहमदनगर जिल्ह्यांचे गाळप प्रत्येकी एक कोटी २२ लाख टन, तर सातारा जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३ लाख मेट्रिक टन झाले आहे.
राज्यातील सर्वांत जास्त साखर उत्पादनात खासगी साखर कारखान्यांचा हात राहिला असून, सहकारी साखर कारखाने उस गाळपात मागे राहिले आहेत. बारामती ॲग्रोचे गाळप २२ लाख मेट्रिक टनपर्यंत गेले असून, अद्याप कारखाना सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात तीन-चार साखर कारखाने सुरू असून, ते मार्चपर्यंत चालतील, असे सांगण्यात आले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील १०-१२ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे.
‘जरंडेश्वर’ने केले १८.६० लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ लाख ६० हजार २०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. तर १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्याने १७ लाख २६ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले तर १६ लाख ३८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.