कात्रज : महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे. निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी प्रत्येक मतदारसंघात राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून चुरस निर्माण केली जात आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. याचा प्रत्यय कात्रज परिसरामध्ये आला आहे.
कात्रज परिसरात ‘यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच’ अशा आशयाचे निनावी बॅनर लागले आहेत. कात्रज-कोंढवा रोड, कोंढवा, कात्रज चौक, नवले ब्रिज रोडवर हे निनावी बॅनर लागले आहेत. या बॅनरमुळे कात्रज परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. ‘यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच’ अशा आशयाचे बॅनर नेमके हडपसर की खडकवासला विधानसभा सदस्याला उद्देशून लावले आहेत. त्याची कात्रज परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. हे बॅनर नेमकी कोणी लावले? कोणाला उद्देशून लावले ? हे अजून समजू शकले नाही. याची चर्चा मात्र कात्रज परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे.