पुणे : शहरात गेल्या नऊ महिन्यात बांगलादेशच्या ५० नागरिकांनी विनापासपोर्ट आणि विनापरवाना वास्तव्य केल्याची बाब काही महिन्यांपूर्वी पोलीस तपासात उघडकीस आली होती. यातील काही महिलांना वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणण्यात आले होते; तर काही जण मजुरीसाठी विनापरवाना पुण्यात राहत होते. वाढत्या घुसखोरीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०४ पारपत्र काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी २९ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. आता बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र सहज मिळते. घुसखोरीवेळी त्यांना स्थानिक पातळीवर मदत केली जात असल्याने घुसखोरी रोखायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसताना आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्र दिले जात असल्याने यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परदेशी नागरिकांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करावी. तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी. परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. आधारकार्ड, जन्म दाखला, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी, असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.