पुणे : पुणे शहरात दोन मैत्रिणी वयोवृद्ध नागरिकाच्या मदतीने पीएमपी बसमध्ये गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील बांगड्या कटरने कापून पळ काढायच्या. या टोळीने वर्षभरात शहरात धुमाकूळ घातला होता. गुन्हे शाखेने या टोळीवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून ७ लाख ६७ हजाराचे १३ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. सुरेखा ऊर्फ नगी छोटु जाधव (वय ३४) आणि शितल ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३३, दोघी रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे आणि उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानूसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही बस थांब्यावर लक्ष ठेवलं.
पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना खबर मिळाली की, बांगडी कटर दोन महिला पालिकेजवळील बसथांब्यावर थांबलेल्या आहेत. त्यानुसार एका पथकाने तेथे धाव घेतली. या महिला चोरी करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून २ मोबाइल आणि १ कटर जप्त करण्यात आलं आहे.
सहायक पोलीस सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अजय थोरात, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, नीलेश साबळे, अंमलदार रुक्साना नदाफ यांनी तपास केला.
वयोवृद्धाच्या मदतीने चोरी
पुण्यातील बसथांबे नेहमी गजबजलेले असतात तेथे सायंकाळी ज्येष्ठ प्रवासी महिलांना दोघी हेरायच्या. त्यांचा वयोवृध्द साथीदार आणि एका तरुणीसोबत घोळक्याने थांबायच्या. बस आली की, आधी वयोवृध्द व्यक्तीला बसमध्ये चढायला लावायच्या त्याला पायऱ्यांवरुन चढण्यास खूप वेळ लागायचा.
तोपर्यंत रांगेत थांबलेल्या एखाद्या ज्येष्ठ महिलेजवळ कोंडाळे करुन तीच्या हातावर तरुण साथीदार ओढणी टाकायची. त्यानंतर हलक्या हाताने दोघींपैकी एक जण कटरने महिलेची बांगडी कापून मागच्या मागे पळ काढायच्या. तर, वयोवृद्ध साथीदार पुढच्या दाराने खाली उतरायचा.