पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केळी कशी डझन विकत घ्यायची यावरुन वाद घातल्याने रागाच्या भरात केळी विक्रेत्याने ग्राहकावरच चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुण्याहून नगरकडे जाणार्या रोडवरील आपले घर सोसायटी बसस्टॉपजवळ शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी सलमान ताजुद्दीन शेख (वय-३३, रा. धर्मानगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका केळी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले घर सोसायटीच्या बसस्टॉपजवळ केळीची हातगाडी उभी होती. फिर्यादी हे केळी घेण्यासाठी हातगाडीवर गेले होते. केळी कशी डझन विकत घ्यायची यावरुन केळी विक्रेत्यासोबत त्यांचा वाद झाला. वादाच्या रागातून केळी विक्रेत्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
त्यानंतर केळी कापण्यासाठी असलेला चाकूने फिर्यादीवर वार केला. तो वार फिर्यादीचे उजव्या डोळयावर लागून फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच केळी विक्रेत्याने मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जामदार करत आहेत.