पुणे : भारतीय निवडणूक आयोगाकडून कालच(दि. १५ ऑक्टोबर ) राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आचारसहिंता लागू होते. असे असताना निवडणुकांच्या घोषणेनंतर महापालिकेकडून शहरात तत्काळ सर्वत्र लागलेल्या राजकीय जाहिराती काढणे अपेक्षित असताना अनधिकृत फ्लेक्स चौकाचौकात उभे असल्याचे रात्री उशिरापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची प्रशासकीय अनास्था आता समोर आली आहे.
महापालिका आयुक्तांनी स्वतः याबाबत दोन दिवसांपूर्वी लेखी आदेश दिले होते. त्यानंतरही याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी पुन्हा एकदा याबाबत आदेश दिले आहेत. दोन दिवसांच्या आत शहरातील सर्व जाहिराती काढण्याचे आदेश संबधित विभागास दिले गेले आहेत.
शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत इच्छुकांची रांग लागल्याचे दिसत असून त्यांच्याकडून दावेदारी करण्यासाठी मतदारसंघात बोर्ड, फ्लेक्स, जाहिराती लावण्यात आल्या आहेत. हे फ्लेक्स अनधिकृत असूनही त्यावर कारवाई करण्यात येत नव्हती. असे असतानाच जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिकेस पत्र पाठवित निवडणुकांच्या घोषणेची शक्यता असल्याने तत्काळ असे जाहिरात फलक काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनीही लेखी आदेश काढले होते. मात्र, तरी सुद्धा हे फलक शहरात कायम असून आता निवडणूकांची घोषणा झाली, तरी महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग ढिम्म असलेला दिसून आला आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत शहरातील सर्व राजकीय व अन्य जाहिरातींचे फ्लेक्स काढून टाकले जातील. त्याबाबत उपायुक्तांना सूचना देण्यात आली आहे.
पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, मनपा