-संतोष पवार
पळसदेव : पळसदेव तालुक्यातील इंदापूर येथील पळसनाथ विद्यालयाच्या खेळाडुंनी विविध शालेय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत खेळातील आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय (रनिंग) धावणे स्पर्धा क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी (दि. 15 ते 16 ऑक्टोबर) या दरम्यान पार पडल्या.
या स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाच्या बालाजी अडवाल या धावपटूने 6000 मीटर धावणे क्रॉस कंट्री या स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 1500 मीटर आणि 3000 मीटर जिल्हास्तरीय शालेय रनिंग (धावण्याच्या) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याची प्रवरानगर (अहमदनगर) येथे होणाऱ्या शालेय विभागीय धावणे (रनिंग)स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच जिल्हास्तरीय शालेय 19 वर्ष वयोगटातील रिले (4 X 400) रनिंग स्पर्धेत मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला .
याचबरोबर भोसे तालुका राजगुरुनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे सुवर्णा नायकवडी रामचंद्र वाघमोडे यांचे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगीराज काळे ,संस्थेचे सर्व पदाधिकारी ,प्राचार्य विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे