पुणे : बालगंधर्व यांचे सहकारी सारंगीवादक उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष यांचे छायाचित्र बालगंधर्व रंगमंदिरातून अचानक गायब झाल्याने अनेक संगीतप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.याबाबत कादरबक्ष यांचे नातू उस्ताद फैयाज हुसेन खान व उस्ताद अन्वर कुरेशी यांनी नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिले असून फोटो पूर्ववत लावण्याची मागणी केली आहे.
उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष हे भारतात एक ख्यातनाम सारंगीवादक म्हणून प्रसिद्ध होते. बालगंधर्व यांनी स्वत: त्यांना झझर येथून मराठी संगीत नाटकांमध्ये साथ करण्यासाठी खास बोलावून केले होते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील बालगंधर्वांच्या दोन फोटोंखाली त्यांचे साथीदार असलेले तबलावादक अहमदजान थिरकवा आणि सारंगीवादक उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष यांचे फोटो काही वर्षांपूर्वी लावण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कादरबक्ष यांचा फोटो येथे दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
बालगंधर्व यांना साथ करताना सारंगी हे वाद्य कादरबक्ष यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांची सारंगी आणि त्यांचा फोटो बालगंधर्व रंगमंदिराच्या दालनात महानगरपालिकेच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून ठेवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो फोटो अचानक गायब झाला आहे. त्यांचा फोटो पुन्हा दालनात लावण्यात यावा, अशी विनंती उस्ताद फैयाज हुसेन खान व उस्ताद अन्वर कुरेशी यांनी पत्राद्वारे व्यवस्थापकांना केली आहे.