पुणे: पुणे जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप बाजरी लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी बाजरी पीक कणसाच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. बाजरीचा या वर्षी चांगला उतारा मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खरीप हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी बाजरीकडे वळत आहेत. मात्र, यंदाही शेतकऱ्यांचा खरीप बाजरी लागवडीकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येते.
त्यातच सरकारकडून मिलेट वर्ष साजरे केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये बाजरी पिकाविषयी महत्त्व वाढीस लागले आहे. त्यामुळे यंदा खरिपात सरासरी ४७ हजार ५१८ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यापैकी ४४ हजार ५४५ हेक्टर म्हणजेच ९४ टक्के पेरणी झाली आहे. शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मजूर रोजगारासाठी मिळत नसल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. साडेतीनशे रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.