पुणे : पुणे विद्यापीठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदुंच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणी विद्यापीठाच्या ललित कला केंद्रप्रमुखासह अन्य विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या सहा जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी जामीन मंजूर केला आहे.
सरकारी वकिलांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असून सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित ‘जब वी मेट’ या नावाच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. या नाटकात रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडत मोठा गोंधळ केला. त्यानंतर ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर केंद्रप्रमुखासह ६ जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, शनिवारी 3 फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ६ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. विशाल मुरळीकर यांनी आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असा युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारपक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सहा जणांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला.