पुणे: पिस्तुलाचा धाक दाखवून भोसरी परिसरात खंडणी, जबरी चोरी, दरोडा व नागरिकांना लुटून परिसरात दहशत माजाविल्याप्रकरणी सनी ऊर्फ सँडी गुप्ता या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सनी ऊर्फ सँडी गुप्ताला तब्बल साडेचार वर्षानंतर न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. अशी माहिती अॅड. सर्वेश निकम व अॅड. विपुल दुशिंग यांनी दिली आहे.
टोळी प्रमुख सनी उर्फ सॅन्डी कन्हैयालाल गुप्ता (वय २४, धंदा काहीनाही, रा. वो-हाडे वस्ती, मोशी) असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय २१, धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी उर्फ सॅन्डी कन्हैयालाल गुप्ता यांनी त्यांच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी यांना पिस्टलचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चैन व रोख रक्कम चोरून नेली. तसेच हवेत गोळीबार करुन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी टोळी प्रमुख सनी उर्फ सॅन्डी कन्हैयालाल गुप्ता व त्याच्या साथीदारांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींवर मोक्काची कारवाई झाली होती.
दरम्यान, या खटल्यात आरोपी सनी उर्फ सॅन्डी कन्हैयालाल गुप्ता याने अॅड. सर्वेश निकम व अॅड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी अॅड. सर्वेश निकम व अॅड. विपुल दुशिंग यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तींवर जमीन मंजूर केला आहे.