पुणे : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून गेल्यावर्षी करण्यात आला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक चंद्रभान उर्फ भानुदास खळदे याला न्यायालयाने दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी याबाबतचे आदेश दिले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारात १२ मे २०२३ रोजी किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा निघृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात चंद्रभान खळदेसह नऊ आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खळदेविरुद्ध खून, कट रचणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर खळदे याने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. आरोपीतर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. अक्षय पटणी, अॅड. पार्थ चव्हाण यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने खळदे यांची दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.