शिरुर : शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 25 दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आरोपींनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकारही समोर आला होता. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. यातील एका आरोपीला न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी ऋषिराज अशोक पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्वरित भाऊसाहेब वीरा कोळपे, तुषार संजय कुंभार, मयूर संजय काळे यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी तुषार कुंभार यांनी ॲड. गणेश पी. माने यांच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. सदर प्रकरणात उपरोक्त आरोपीविरोधात कोणताही सबळ पुरावा दाखल नसून केवळ संशयाच्या आधारावर गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यात लावलेले खंडणी चे कलम या आरोपीस लागू होत नाही. सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आरोपीच्या कोठडीची गरज नाही. यासह इतर अनेक न्यायिक मुद्द्यांवर ॲड.गणेश पी. माने यांनी युक्तिवाद केले.
ॲड.गणेश पी. माने यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुषार कुंभार यास पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के पी क्षीरसागर यांनी दिले आहेत. तर या खटल्यात ॲड.गणेश माने यांना ॲड.धनंजय गलांडे व ॲड.उमेश मांजरे यांचे सहकार्य मिळाले.