पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि यवत पोलिस ठाण्याच्या पथकाने केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून 50 लाखांनी भरलेली बॅग हिसकावून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी शरद मधुकर डांगे (वय ७६, रा. चैतन्य वाडी, बुलढाणा, ता. जि. बुलढाणा) यांनी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून बंडू ऊर्फ गजानन काळवाघे( वय ४०, रा. बुलढाणा, चैतन्यवाडी, ता. जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. ही घटना २३ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद डांगे हे त्यांची सुन व व्याही यांचेसोबत रघुनंदन हॉटेल, चौफुला केडगाव येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांचे सोबत असलेल्या बंडू काळवाघे याने फिर्यादीस चाकू दाखवून जमीनीचे व्यवहारातून बिसार म्हणून मिळालेली ५० लाख रूपये असलेली पैशाची बॅग त्यांच्या चारचाकी वाहनातून जबरदस्तीने काढून घेवून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे व यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवाघे हा केडगाव न्हावरा रोडने शिरूरच्या दिशेने जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक आणि शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने न्हावरा फाटा या ठिकाणी सापळा रचून आरोपी बंडू काळवाघे याला ताब्यात घेतले. आरोपीकडून ४५ लाख रूपये रक्कम जप्त करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.