पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीची उत्पादक कंपनी असणाऱ्या बडवे इंजिनियरिंग लिमिटेडने ‘बेलराइज इंडस्ट्रीज’ म्हणून आपला ब्रँड करत असल्याची घोषणा केली. याद्वारे कंपनीचे नाव, कंपनीचे ब्रँडिंग या दोन्ही गोष्टींमध्ये बदल केले आहेत. करण्यात आलेले बदल ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांतीकरक ठरणार असून यामुळे कंपनीचे या क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे नाव व ब्रँडिंग बदलण्यात आल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, बजाज ऑटोचे मॅन्युफॅक्चरिंग हेड कौशल झंझारी, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्यासह ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ‘बेलराइज इंडस्ट्रीज’चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे म्हणाले, बडवे इंजिनियरिंगला ‘बेलराइज इंडस्ट्रीज’ हे नाव देताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही केलेल्या मेहनत, सातत्य आणि प्रगतीचे प्रतिबिंब आमच्या रिब्रँडिंगमध्ये दिसून येत आहे. सध्या नव्याने विकसित झालेल्या पर्यावरण पूरक तंत्रज्ञानामुळे येणार काळ हा या तंत्रज्ञानाचा असणार आहे. यामुळेच आम्ही आमच्या धोरणांमध्ये देखील अमुलाग्र बदल करत असून त्याचे प्रतिक कंपनीच्या ब्रँडिंगमध्ये देखील परवर्तीत व्हावे, अशी आमची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही स्वत:ला नवीन रुपात आपल्यासमोर आणले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बेलराइज’ हा शब्द दोन गोष्टीना विचारात घेवून बनविण्यात आला आहे, त्यातील एक म्हणजे कंपनीचा आलेला वारसा आणि स्वप्नाचा वेध घेणारे उज्ज्वल भविष्य. यातील पहिले तीन अक्षरे ‘बीईएल’ हे वारसा संपन्न असलेल्या बडवे इंजिनियरिंग लिमिटेडचे प्रतिनिधित्व करतात तर आरआयएसई (राइज) हा आमच्या समभागधारकांसाठी आहे, जो त्याना सर्वांच्या अर्थवाढीचे संकेत देणारा आहे.
भविष्यात येणारा आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहोत, असा विश्वास श्रीकांत बडवे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, मी श्रीकांत बडवे यांना बडवे इंजिनियरिंगच्या स्थापनेपासून ओळखतो. या कंपनीला ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रणी म्हणून प्रस्थापित करताना त्यांनी केलेला संघर्ष व मेहनत या दोन्ही गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांचे जीवन म्हणजे नवउद्योजकांसाठी महत्वपूर्ण असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘बेलराइज इंडस्ट्रीज’ हे नवीन नाव व ब्रँडिंग भविष्यात देखील यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे, असे डॉ. कराड म्हणाले.
नवीन विकसित करण्यात आलेल्या ग्रीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून इ-वाहन विभागातील उत्पादनांच्या निर्मितीमध्ये आम्ही महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमच्या ग्राहकांना सर्वोच्च दर्जाची उत्पादने तसेच सेवा उपलब्ध करून देणार आहोत. ‘इंजिनियरिंग फ्युचर्स’ अशी आमची ओळख आहे, यासाठीच आम्ही आमच्या पोर्टफ़ोलिओमध्ये अजून काही उत्पादन निर्मितीत उतरत आहोत, असे बेलराइज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे यांनी सांगितले.