भोर : तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणी येत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भोंगवली फाटा येथे स्थानिकांच्या वतीने सोमवारी (दि. १२) सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आज भोंगवली फाटा या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यापूर्वी, २३ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागास निवेदन देऊनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. सारोळा, पांडे, राजापूर, भोंगवली, भांबवडे, सावरदरे आणि न्हावी या गावांतील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी भालचंद्र जगताप, अजय कांबळे, विजय गरुड, अरुण पवार, बाळासाहेब बोबडे, भरत सोनवणे, सत्यजित जगताप, विश्वजित जगताप, उदय शिंदे, सुशील गायकवाड, निलेश सोनवणे, विजय चव्हाण, मिलिंद तारू यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला, तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटने, छोटे-छोटे अपघात होत आहेत. याशिवाय, वाहनचालकांच्या पाठीला, मानेला आणि कमरेलाही त्रास होत आहे, असे अनेक तक्रारी मांडण्यात आल्या.
बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
सारोळा ते भोंगवली-माहूरखिंड रस्त्याचे खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी पत्र प्राप्त झाले आहे. वस्तुत: २२ जुलै पासून ऑगस्ट पहिल्या आठवड्यापर्यंत प्रचंड पाऊस झाल्याने खड्डे भरणेचे काम करणे शक्य झाले नव्हते. मात्र, ०८ ऑगस्ट नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे हे खड़ी मुरुम अथवा जीसीबीच्या साहाय्याने भरुन घेण्यात येत आहेत. सदर रस्त्यावरचे खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत ठेवणेत येत असून रस्त्याचे कामास पावसाळया नंतर लगेचच सुरु करण्यात येत आहे.