विजय लोखंडे
वाघोली : पावसाच्या पाण्यामुळे वाघोली-लोहगाव, वाघोली-केसनंद रस्त्यांबरोबरच पुणे-नगर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय दूरवस्था झाली असून नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तात्काळ खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाघोलीतील नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळ्यामध्ये दरवर्षी नागरिकांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागत असल्याने तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली असल्याचे वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.
सातव पाटील यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे नगर महामार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. महामार्गावर पावसाळी नाल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, १ असून वळंबा नसून खोळंबा,अशी स्थिती झाली असून पाणी महामार्गावर साचून राहते. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती अंतर्गत रस्त्यांची सुद्धा झाली आहे.
रस्त्याला तळ्याचे स्वरूप
भावडी-फुलमळा, गुलमोहर सोसायटीचे रस्त्यावर खड्डे असल्याने येथे पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप येत आहे. या रस्त्यावर एक मोठे इंजिनिअरींग कॉलेज आहे. येथे रहिवाशांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे. अंतर्गत रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा संबधित विभागाकडून मड पंपाद्वारे उपसा केला जात आहे. यामुळे विध्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.