इम्रान अत्तार

पुणे: भोर शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे एकमेकांशी योग्यरीत्या जोड न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते अधूरे राहिल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत तबरेज नासिर खान (रा. 660, भेळकेवाडी, भोर) यांनी भोर नगरपरिषदेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
तबरेज खान यांनी दिनांक १० जून २०२५ रोजी लेखी स्वरूपात नगरपरिषदेकडे अर्ज करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून फोनवरून व प्रत्यक्ष भेटीद्वारे नगरपरिषद अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र, नगरपरिषदेकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर तबरेज खान यांनी २३ जून २०२५ पासून भोर नगरपरिषदेसमोर शांततामय उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. यासंदर्भातील अर्ज भोर पोलीस स्टेशन व आमदार श्री. मांडेकर यांना देखील देण्यात आली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत केवळ करवसुलीवर भर देणाऱ्या प्रशासनाची ही उदासीनता भोरकरांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.








