पुणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले आत्मक्लेश उपोषण आज (दि. ३०) मागे घेतले आहे. ईव्हीएम आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशांच्या प्रचंड वापराविरोधात तसेच आढाव उपोषण सुरू केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांनी पाणी घेत उपोषण मागे घेतले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन संपूर्ण राज्यभर न्यावे, अशी अपेक्षाही आढाव यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याने महविकास आघाडीने ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावरुन राज्यभर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आणि प्रचंड पैशांचा वापर झाल्याचा आरोप करत ९४ वर्षीय बाबा आढाव उपोषणाला बसले होते. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्याच्या फुले वाड्यात आंदोलन सुरू होते. त्यांच्या आंदोलनाला जेष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांनी भेट दिली.