केडगाव : आयुष्मान भारत कार्ड काढून घ्या, आयुष्मान कार्ड लवकर काढून घ्या आणि सरकारीसह खासगी दवाखान्यांतही पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळवा, आता उपचारांच्या खर्चाची चिंता मिटली, या आशयाच्या जाहिराती शासनाकडून गेली वर्षभर एकदम जोरात सुरु आहेत. मात्र, प्रत्यक्षात आयुष्मान भारत कार्डचा सर्वसामान्य नागरिकांना काडीचाही उपयोग होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
खेडेगावातील सर्वसामान्य नागरिक आपल्या रुग्णाला मोफत उपचार मिळतील, या आशेमुळे खाजगी विम्याकडे पाठ केली होती. तर काहींनी जुनी आरोग्य पॉलिसी बंदही केल्या. पण आता मात्र त्यांना या आयुष्यमान भारत योजनेमुळे पश्चातापाची वेळ आली असून, या मोफत योजनेचा विचार करून विनाकारण हॉस्पिटलचे उंबरे झिजवावे लागत आहेत. तसेच दुसरीकडे हॉस्पिटल या कार्डधारकांना अक्षरश: हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना खिशातील पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
कार्ड काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त दबाव
आयुष्मान भारत योजनेचा महाराष्ट्रात नुसताच गवगवा केला जात असून, आरोग्य यंत्रणेला वेठीस धरून नागरिकांचे कार्ड मात्र काढण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून संबंधित यंत्रणांवर दबाव टाकला जात आहे. त्यांना टार्गेट दिले जात आहे. नागरिक आम्हालाच प्रश्न विचारत असून, काय उत्तर द्यावे हे आम्हालाच समजत नसल्याचे अधिकारी खाजगीत बोलून दाखवत आहेत.
परंतु पदरी निराशाच…
‘आयुष्मान भारत योजने’चे केवळ कार्डच मिळते; परंतु प्रत्यक्ष उपचार मिळत नाही. ज्याप्रकारे जाहिरात सुरू आहे, तसे काहीच नाही. कारण यामध्ये एकही हॉस्पिटल नाही. येत्या मार्चनंतर हा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. उपचारासाठी प्रत्यक्षात तरतूद किंवा मार्गदर्शक तत्त्वे काढलेली नाहीत. लोकांना वाटते की, पाच लाखांचे उपचार मोफत मिळतील, म्हणून ते हॉस्पिटलचे उंबरठे झिजवतात. परंतु, पदरी निराशा पडत असल्याचे रुग्णाचे नातेवाईक बोलत आहे.
कार्ड मिळतं पण उपचार मात्र नाहीच
आयुष्मान भारत योजनेचे केवळ कार्डच मिळते; परंतु प्रत्यक्ष उपचार मिळत नाही. ज्याप्रकारे जाहिरात सुरू आहे, तसे काहीच नाही. कारण या योजनेमध्ये खेडेगावातील एकही हॉस्पिटल येत नाही, असे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सांगितले जाते. तसेच ज्याने आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला, असा गाव-खेड्यातील एकही रुग्ण अजून तरी पाहण्यात आला नाही.
– भरत गडदे, नातेवाईक
टार्गेट दिल्याने आम्ही आयुष्मान कार्ड काढतो
आम्हाला सांगितले जाते, नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढा. टार्गेट दिले जाते. त्यामुळे आम्ही कार्ड काढून देतो. पण जेव्हा एखाद्या कुटुंबातील रुग्णाला हॉस्पिटलची गरज पडते तेव्हा नातेवाईक आम्हालाच विचारतात, कारण कार्ड काढताना आम्ही त्यांना या कार्डचे फायदे सांगितलेले असतात. पण प्रत्यक्षात ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे, असे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.