जिंती : मागील काही दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिंती (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात भारी ठरली आहे. या शाळेला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी पॅलेस मध्ये आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.२२) पार पडला. या सोहळ्यात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र यादव यांच्या हस्ते जिंती शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संतोष जगताप यांनी स्वीकारला. यावेळी शाळेचे शिक्षक निळकंठ शेळके, रामदास पाटील, अविनाश नेवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणात प्राथमिक शाळांचे योगदान अनमोल आहे. प्राथमिक शाळांचे हे कार्य समाजाभिमुख व्हावे, प्राथमिक शाळांचे शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा. यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने (संचालक मंडळाने) उपक्रमशील प्राथमिक शाळांचा गौरव करण्यात येतो. त्याअनुषंगाने सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षी आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो.
जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये चमकले आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून आपल्या कार्याची चमक दाखवित आहेत. शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या प्राथमिक शिक्षणात भरीव कार्याची व उल्लेखनीय उपक्रमांची दखल पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेऊन त्यांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. नितीनजीराजे भोसले यांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापक संतोष जगताप यांच्यासह सर्व शिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आला. यावेळी अर्जुन वरगड, सिकंदर मुलाणी, संदीप जगताप, इंद्रजीत शेलार, सागर जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझे वडील, मी या शाळेत शिकलो आहे. तर आता माझी मुलेही या शाळेत शिक्षण घेत आहेत. माझ्या गावातील म्हणा किंवा माझ्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असल्याने मला खूप आनंद झाला आहे. या शाळेतील शिक्षक मुलांचे कला गुण ओळखून चांगल्या पद्धतीने अध्यापन करीत आहेत. मात्र पुढाऱ्यांनो गावातील गट तट व राजकारण बाजूला ठेवून सर्व शिक्षकांना सर्वोतोपरी सहकार्य करा.
संदीप जगताप (पालक – जिंती, ता. करमाळा)
जिंती शाळेला मिळालेला हा आदर्श शाळा पुरस्कार हा पहिलाच पुरस्कार आहे. ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. स्पर्धा परीक्षेतील मुलांचे यश, शालेय परिसर व स्वच्छता, सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अद्यावत शालेय अभिलेखे, दरवर्षी शाळेच्या पटात होणारी वाढ, सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत घेण्यात येत आहेत. सर्व शिक्षकवृंद चांगल्या पद्धतीने अध्यापक करीत असल्याने शाळेची गुणवत्ता चांगली आहे. शाळेला शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे नेहमी सहकार्य असते. शाळेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणणे वावगे ठरणार नाही.
संतोष जगताप (मुख्याध्यापक – जिंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा)