पुणे : रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि. २९) पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली. या रिक्षाचालकाविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या महिलेची मुलगी शाळेतून रिक्षाने घरी चालली होती. त्या वेळी रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केला.
त्यानंतर मुलगी पुन्हा शाळेत चालली असताना रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करून अडवले. आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्याने मुलीला सांगितले. त्याच्या त्रासामुळे घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.