वडगाव मावळ (पुणे): तालुक्यातील टाकवे बुद्रुक या ठिकाणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सख्ख्या मावशीनेच आपल्या अल्पवयीन साथीदारांसोबत मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सांत्वन करण्यासाठी ही मावशी अल्पवयीन मुलीच्या घरीदेखील जाऊन आली. या प्रकरणात वडगाव मावळ पोलिसांनी तब्बल ४५ ते ५० सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्या मावशीला ताब्यात घेतले असून तिच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणात वडगाव मावळ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन विधिसंघर्ष बालकांची येरवडा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे १९ जुलै रोजी अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या अनुषंगाने पोलिसांच्या चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. एक टीम मुंबई येथे पाठविण्यात आली, तर दुसरीकडे तपास करत असताना टाकवे, कान्हे फाटा, वडगाव, शिरगाव, कासारसाई या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. तांत्रिक तपास करून शेवटी मान या ठिकाणी अल्पवयीन मुलीची सुटका केली. या सगळ्यात मास्टरमाईंड असलेल्या महिलेला ताब्यात घेतले असून अपहरण करण्याचा उद्देश अजूनही निष्पन्न झालेले नसून तपासात लवकर निष्पन्न होईल.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, एएसआय सुनील जावळे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, बापूराव गावडे, शशिकांत खोपडे, सिद्धेश वाघमारे, अमोल तावरे, अधिकराव झेले, किरण ढोले, देविदास भांगे, प्रतीक राक्षे, चेतन दळवी, विशाल जांभळे, चेतन कुमार, पोलीस पाटील अतुल असवले यांनी केली.